पंचायतराज अभियानात मरळनाथपूर प्रथम; राज्यस्तरीय स्पर्धेत मिळवला मानाचा बहुमान
- Rohit More
- Jun 11
- 1 min read
मरळनाथपूर | प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी पंचायतराज अभियानात मरळनाथपूर ग्रामपंचायतीने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावून गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मरळनाथपूर गावाने पंचायतराज अभियानांतर्गत विविध विकासकामे, स्वच्छता, ग्रामविकास, लोकसहभाग आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या जोरावर उत्कृष्ट कामगिरी नोंदवली. या कामगिरीच्या बळावर गावाला राज्यातील अव्वल ग्रामपंचायतींपैकी एक म्हणून गौरविण्यात आले.
या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मरळनाथपूर ग्रामपंचायतीचे विशेष अभिनंदन केले. तसेच जिल्हा प्रशासन आणि पंचायत राज विभागातील अधिकाऱ्यांनीही गावाच्या विकासकामांचे कौतुक केले.
या यशामागे ग्रामविकास अधिकारी पवार, कृष्णात कुलकर्णी, तसेच पंचायत राज विभागातील विविध अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. यामध्ये एम.आर.डी.एस. प्रमुख, वाळवा विस्तार अधिकारी अनिल जाधव, उपसरपंच शंकर राऊत, राजाभाऊ खाडे, विकास उपाध्ये, स्मा. आर. पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांचे योगदान महत्त्वाचे ठरले.
तसेच ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, विविध समित्यांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी विकासकामांमध्ये दिलेल्या सक्रिय सहभागामुळेच हे यश शक्य झाले, अशी भावना ग्रामपंचायतीच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांना राज्यस्तरावर मिळालेली ही दाद भविष्यातील विकासकामांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. मरळनाथपूरच्या या यशामुळे संपूर्ण वाळवा तालुक्याचा गौरव वाढला आहे.
Comments